आवडते मज मनापासूनी शाळा,
लाविते लळा जशी माऊली बाळा

साने गुरुजींच्या या उक्तीप्रमाणे निसर्गाच्या भव्य व सुंदर सानिध्यात असलेल्या आपल्या दत्तसेवा विद्यालय विद्यार्थ्यांवर आईप्रमाणे प्रेम करीत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन विद्यालयाने सतत त्यांना नवनवीन सुविधा पुरविल्या आहेत. त्यातीलच एक महत्वाची सुविधा म्हणजे शाळेची प्रशस्त संगणक सुविधा. आजच्या युगातील संगणकाचे महत्व लक्षात घेऊन शाळेने विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त संगणक कक्ष उभारला असून आज अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत.

विद्यालयाची भव्य प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना विज्ञान निष्ठा, वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याची सवय लावते. सर्व साहित्यांनी संपन्न असणारी ही विद्यालयाची प्रयोगशाळा म्हणजे विद्यालयाच्या विकासाची दिशा आहे. हाच वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासत शाळेने पवनचक्की उभारली आहे. जी विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठा जोपासण्याची प्रेरणा देते व भारनियमन समस्येवर मात करते. शाळेचे सुसज्ज ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मोलाचे योगदान देते. ग्रंथालयात असणारी वेगवेगळी पुस्तके विद्यार्थ्यांच्या जीवनाला मार्गदर्शक ठरतात.

विद्यार्थ्यावर चांगले संस्कार करण्यासाठी ग्रंथालय उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करते. वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्याचे काम शाळा करत असते. सर्व महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या करुन विद्यार्थ्यांच्यावर आदर्श संस्कार घडविण्याचे कार्य शाळेत केले जाते.

शाळेच्या क्रीडांगणाला शाळेचा आत्मा म्हटले जाते. विद्यार्थ्यांची सर्वांगिण विकास घडविण्याचे कार्य क्रीडांगणामुळे होते. विद्यालयाचे क्रीडांगण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच आहे. या क्रीडांगणावर अनेक क्रीडा स्पर्धा, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच यशस्वी आयोजन केले जाते. ज्या पध्दतीने विद्यार्थी शाळेतील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात त्याच प्रकारे बाहेरील स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी हिरीरीने सहभागी होतात व शाळेच्या नावलौकिक वाढवितात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या शाळेतील कुमार सौरभ राजाराम म्हस्के हा विद्यार्थी या विद्यार्थ्याने वकृत्व स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये प्रत्येक वर्षी बाजी मारली आहे.

याबरोबर आपल्या शाळेमध्ये ज्या रांगोळी स्पर्धा होतात, या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी नेहमीच अग्रभागी असतात. याप्रमाणे शाळेतील अध्यापकांचे कार्यही वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी देखील अनेक यशस्वी पारितोषिके मिळवून दत्तसेवा विद्यालयाच्या मुकुटामध्ये मानाचे तुरे रोवले आहेत.

आपल्या शाळेची गुणवत्ता हेच आपल्या शाळेचे प्रमुख यश आहे. आपल्या शाळेत प्रतिवर्षी MTS स्कॉलरशीपचा निकाल १०० टक्के लागत असून सन २०१० मध्ये झालेल्या तिसरी MTS परीक्षेत कु. क्रांती संजय पाटील व कु. श्रेया संजय पाटील या विद्यार्थींनींने केंद्रात अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक पटकावून शाळेचा गौरव अधिकच वाढविला आहे. तसेच त्याच वर्षी इयत्ता तिसरीमध्ये STS परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून केंद्रात कु. क्रांती संजय पाटील प्रथम, कु. सौरभ राजाराम म्हस्के द्वितीय, कु. अक्षता संपतराव पाटील व कु. श्रेया संजय पाटील या विद्यार्थीनींना विभागून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.

शाळेच्या यशस्वी वाटचालीची परंपरा अखंड ठेवण्याचे कार्य चौथी स्कॉलरशीपच्या विद्यार्थीनींनी कायम ठेवले आहे.  त्यांचा निकालही १०० टक्के लागला असून कु. क्रांती संजय पाटील ही विद्यार्थीनी सन २०१०-२०११ या शैक्षणिक वर्षात स्कॉलरशीप परीक्षेत राज्यात आठवी आली आणि तिने एका छोट्याशा खेडेगावातील शाळेचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरविले आहे. यावरुन शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती असणारी मेहनत आणि निष्ठा दिसून येते.

प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती लक्षात येण्यासाठी स्वतंत्र विद्यार्थी फाईल तयार केली जाते. अध्ययनात कमी पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त प्रगती हेच आपले ध्येय असल्यामुळे जास्तीत जास्त नवीन व अद्ययावत ज्ञान त्यांना दिले जाते. यासाठी शाळेने इयत्ता पहिली ते सातवी साठी संगणकाचा GIIT हा कोर्सदेखील सुरु केलेला आहे.

शिवाय अध्ययनाबरोबर स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणदेखील दिले जाते आहे. शाळेमध्ये लेझीम-झांज पथक उभारुन विद्यार्थ्यांच्या अभिवृत्तीला चालना दिलेली आहे.

दत्तसेवा विद्यालय या छोटाशा रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. अल्पावधीत शाळेने घेतलेली उंच गरुडझेप वाखाणण्याजोगी आहे.